Wednesday, 10 November 2010

किमान एकाला तरी घरी पाठवा

दोन चव्हाणांच्या येण्याजाण्याची कारणे परस्परविराधी आहेत. भ्रष्ट कृतीमुळे अशोक चव्हाणांना जावे लागले तर स्वच्छ प्रतिमेमुळे पृथ्वीराज चव्हाणांना यावे लागले. येथे भ्रष्ट कृती हा शब्द मुद्दामच वापरला आहे. माजी चव्हाणांनी जे केले त्याला त्याला भ्रष्टाचार म्हणणे म्हणजे सध्याच्या काळात त्या शब्दाचा अपमान आहे. खरतर तो त्यांच्या माजी पदाचाही अपमान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना साध्या दोन, पाच कोटींच्या फ्लॅटच्या प्रकरणावरून पायउतार व्हावे लागावे हे समस्त राज्याला मान खाली घालावे लागणारे आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या, श्रीमंत राज्यातल्या बिल्डर स्पॉन्सर्ड सरकारचे प्रमुख काहीशे कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला सामोरे जाऊन पदमुक्त झाले असते तर राज्याची काही शान राह्यली असती. पण अशोकरावांनी नावात राव आणले तरी ही शान मात्र घालवली. आफ्टर ऑल प्रश्न देशाच्या आर्थिक राजधानीतील मुख्यमंत्र्यांचा आहे. पक्षाच्या हायकमांडलाही हा निर्णय घेताना जरा जडच गेले असेल. जेथे शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून (फक्त आरोपांवरूनच, कारण नंतर हे आरोप लुप्त होतात, त्याचे काय होते ते कळत नाही, कधीच कोणाला आरोप सिध्द होऊन शिक्षा झालेली दिसत नाही) मुख्यमंत्र्यांना दूर करायचे तेथे ही दोन, पाच कोटींच्या आरोपावर कृती करण्याची वाईट वेळ आली. आर्थिक मंदी अजून सुरू असल्याचीच तर ही लक्षणे नव्हेत?
असो. जे झाले ते झाले. त्यात आता बदल करणे शक्य नाही. पण हे जे विचार मनात आले ते भ्रष्टाचाराच्या बाबतीत राज्याने गाठलेल्या कमाल पातळीमुळे. या एका विषयाबाबत सर्व पक्षात कमालीचे सौहार्द्य, एकमत आणि एकवाक्यता आहे. ही एकवाक्यता केवळ सर्वपक्षीय राजकारण्यांमध्येच आहे असे नाही तर नोकरशाहीही आता त्यांना सामील झाली आहे आणि त्यांनीही नोकरशाहीला सुखनैव सामावून घेतले आहे.
गंमत म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना कदाचित पद सोडावे लागते. तेव्हढी नौबत नाही आली तरी किमान माध्यमांच्या अवघड, अडचणीच्या, कोंडीत पकडणा-या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. सर्व जनता ते बघते. पण नोकरशाहीला तेव्हढेही कष्ट पडत नाहीत. भले भले अधिकारी गप्प बसून गंमत बघत रहातात. ते ना माध्यमांना सामोरे जात, ना विधानमंडळाला. आपण कोणाला तरी एक किमान आन्सरेबल आहोत असेही त्यांना वाटत नाही.
अगदी आदर्शचेच उदाहरण घेतले तरी राजकारण्यांबरोबरच अधिका-यांची नावेही त्यात आली आहेत. त्यांची प्रतिक्रिया कुठे बघितली आहेत? त्या सर्वांच्या सुपर बॉसला घरचा रस्ता पकडावा लागला. पणते सर्व मात्र सुखनैव आहेत. आता मुख्यमंत्रीच घरी गेल्याने, हा विषय आता संपल्यातच जमा आहे. थोड्याच दिवसात लोक विषय विसरतील, मिडीया विसरेल आणि आधिकारी आदर्शमधील आपल्या नव्या घरात छान विसावतील.
या सर्व पार्श्वभूमीवर नवे चव्हाण राज्यात येत आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. म्हणूनच ते येत असल्याचे सांगीतले जात आहे. त्यांच्याबरोबर त्यांना राज्याची प्रतिमाही बदलायची असेल तर त्यांनी प्रथम नोकरशाहीच्या भ्रष्टाचाराला वेसण घालावी. लोकांना जास्त त्रास होतो तो निम्न स्तरातील नोकरशाहीच्या थेट भ्रष्टाचाराचा. निम्न स्तराला आशीर्वाद असतो उच्च स्तराचा किंबहुना उच्च स्तराकरता पैसे गोळा करण्याचे काम अनेकदा निम्न स्तराकडे असते.
सर्व स्तरावर इतका प्रचंड भ्रष्टाचार असताना कोणाला कुठे शिक्षा मात्र झालेली दिसत नाही. त्यामुळे या भ्रष्ट नोकरशाहीला (आणि सहकारी राजकारण्यांनाही) स्वच्छतेच्या नांदीचा स्टर्न सिग्नल द्यायचा असेल तर नवे चव्हाणसाहेब आल्या आल्या किमान काही भ्रष्ट अधिका-यांना घरी पाठवा आणि सर्वच नोकरशाहीला संदेश द्या यू मीन बिझनेस. तसे झाले तर मग महाराष्ट्रातील लोकांना तरी गुजरातच्या मोदींच्या परीणामकारक राजवटीचे कौतूक करत बसावे लागणार नाही.

No comments:

Post a Comment