Thursday, 9 June 2011

मराठी पाऊल पडते कुठे?

प्रथम साहित्यात रविंद्रनाथ टागोर मग अर्थशास्त्रात अमर्त्य सेन, अधेमधे शास्त्रात सी.वी.रामन किंवा सुब्रमण्यम, सामाजिक कार्यात मदर तेरेसा, सिनेमात सत्यजित रे, रेहमान वगैरे, याशिवाय सामाजिक कार्यात रूथ मनोरमा, स्वामी अग्निवेश, असगर अली इंजिनीयर, जगन्नाथन इ. साहित्य, कला, पत्रकारीतेत अरूण शौरी, बी.जी.वर्गीस, अरूंधती रॉय, अरविंद अडीगा ते अगदी कालचा पुलीट्झर विजेता सिध्दार्थ मुखर्जी.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या नोबेल, मॅगसेसे, राईट लाईवलीहूड, बुकर, ऑस्कर, पुलीट्झर अश्या विविध पुरस्कार विजेत्या भारतीयांची ही काही नावे. त्यातली टागोर किंवा रामन वगैरे अशी काही नावं खूप जुन्या काळातली असली तरी इतर काही नावं गेल्या काही वर्षांतलीच आहेत. मात्र आपल्या बुद्धीवादी वारश्याचा, पुरोगामी विचारांचा, प्रगतिक विचारसरणीचा, साहित्यिक कर्तृत्वाचा, वैज्ञानिक परंपरेचा आणि सामाजिक कार्याच्या परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या मराठी भाषिकांपैकी एकाचेही नाव त्यात .

सामाजिक क्षेत्रात मराठी नेतृत्वानं काहीशी बानाहीजी मारलेली दिसते. विनोब भावे, सी डी देशमुख, आरोळे पतीपत्नी, पांडुरंगशास्त्री आठवले, बाबा आमटे यांची नावं मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांच्या यादीत दिसतात. पण त्यातही गंमत आहे. या यादीत शेवटचं मराठी नाव १९९१६ साली पांडुरंगशास्त्रींचं आहे. त्यांनंतर परत मराठी नाव नाही. प्रती नोबेल मानला गेलेला राईट लाईवलीहूड पुरस्कार १९९१ मध्ये मेधा पाटकर आणि बाबा आमटेंना नर्मदा आंदोलनाकरता मिळाला. तिथेही त्यानंतर मराठी नाव नाही. नोबेल, बुकर किंवा पुलीट्झर आत्तापर्यंत दोन-पाच वेळा भारतीयांना मिळालं. पण त्यात एकही मराठी नाव नाही. नाही म्हणायला भानू (राजोपाध्ये) अथय्या हे एक मराठी नाव गांधी चित्रपटाच्या वेशभूषेकरता ऑस्कर विजेत्यात आहे (आणि ते एखाद्या भारतीयाला मिळालेलंही पहिलंच ऑस्कर आहे). पण तेही १९८२ मध्ये मिळालेलं. त्यानंतर परत मराठी नाव नाही. मध्ये एकदा ‘श्वास’ ऑस्करपर्यंत धडक मारून आला आणि विविध मराठी चित्रपट काही फेस्टीवल्समध्ये दाखवले गेल्याचं सध्या वाचायला मिळतं. नाही म्हणायला एक क्रिकेट असं क्षेत्र आहे की जिथं गावस्कर, वेगंसरकर, संदीप पाटील, सचिन अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची परंपरा आहे.

कोणताही प्रांतीयवाद, भाषावाद वा या सगळ्या विषयीचा दुराभिमान वगैरे न बाळगताही १९६० पासून सुवर्णमहोत्सवी काळापर्यंत महाराष्ट्राची उत्तरोत्तर ही अशी पिछेहाट का झाली आहे, किंवा अजूनही सुरू आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. बंगाल आणि महाराष्ट्र यांच एक वेगळं नातं आहे. ते खूप जुनं आहे. या दोन्ही भाषिक समाजात खूप साधर्म्य आहे. हे दोन्ही समाज विद्वान, कलासक्त, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर, पैशाला कमी महत्व देणारे आणि विद्येची साधना करणारे मानले जातात. मराठीतले पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी राजा राममोहन रॉय यांच्याकडून प्रेरणा घतल्याचे सांगितले जाते. तर लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेतलेले अनेक बंगाली तरूण होते. दोन्हीकडची रंगभूमी समृध्द आणि प्रयोगशील आहे. सिनेमा तर महाराष्ट्रातच जन्मला आणि बंगालमध्ये (व नंतर मल्याळीध्ये) समृध्द झाला. मराठी माणसानं सिनेमा भारतात आणूनही आंतरराष्ट्रीय सोडून द्या पण राष्ट्रीय पातळीवरही १९५२ साली ‘श्यामची आई’ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर परत तो पुरस्कार मिळायला मराठी सिनेमाला (श्वास) २००४ पर्यंत तब्बल ५२ वर्षे वाट पहावी लागली. दादासाहेब फाळके भलेही भारतीय सिनेमाचे जनक असतील पण लाईफटाईम अचिव्हमेंट ऑस्कर रे घेऊन गेले (यात रे यांचा अवमान करण्याचा हेतू नाही, त्यांचं काम मोठं आहेच). वैचारीकतेत, आवडी निवडीत इतके साम्य असूनही बंगाल खूप पुढे गेले दिसतो. आज माध्यम क्षेत्रावर तर बंगाल्यांचा ताबा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

देश पातळीवरील कोणतही महत्वाचं मॅगझीन आज उघडून पाहिलं तर प्रत्येक लेखात त्या त्या विषयांसंबंधात ज्या तज्ज्ञ वा महत्वाच्या लोकांचे कोटस् (अवतरणे) दिलेले असतात, त्यात महाराष्ट्राशी संबंधित विषय सोडले तर इतर राष्ट्रीय विषयांबाबत मराठी तज्ज्ञाचा कोट अभावानेच आढळतो. तेच टीव्हीबाबत. राष्ट्रीय पातळीवरील विषयांबाबतच्या चर्चांमध्ये अभावानेच मराठी नाव सहभागी करून घेण्यात आल्याचे दिसते. (थोडासा अपवाद टाइम्सचे माजी संपादक दिलीप पाडगावकरांचा). मराठी राजकारणी, पत्रकार, तज्ज्ञ असतात ते केवळ महाराष्ट्राशी संबंधित विषय असेल तरच. दोनेक वर्षांपूर्वी एका नियतकालिकाने परदेशातील सर्वाधिक प्रभावी भारतीयांवर विशेषांक काढला. त्यात एकही मराठी नाव नव्हतं. अर्थात ही मात्र त्या नियतकालिकाचीही चूक आहे. कारण बाकी काही नाही तरी किमान सिटीबँकेचे विक्रम पंडीत, बोईंगचे दिनेश केसकर आणि फिशमन प्रभूचे सुधाकर प्रभू यांची नावे त्यात यायलाच हवी होती. तिथे मराठी कर्तृत्व मागे नाही. पण मग इतरांच्या तुलनेत ही मंडळी अश्या नियतकालीकांपर्यंत, त्यांच्या पत्रकारांपर्यंत पोचण्यात कमी पडतात का? असं करणं म्हणजे पुढेपुढे करणं म्हणून ते टाळतात का? का ते नेटवर्किंगमध्ये कमी पडतात? तसं तर मराठी माणूस नेटवर्किंगमध्ये कमी पडतो (किंवा खरंतर तो ते करणं कमीपणाचं वा चुकीचं मानतो) ही सार्वत्रिक तक्रार आहे. का आपली आपल्यालाच किंमत नाही तर इतरांना ती का वाटावी अशी परीस्थिती आहे?

पण प्रश्न केवळ नेटवर्किंग वा प्रेझेंटेशनचा नाही. या पोह-यांचा उपयोग करायला मुळात आधी आडात काहीतरी असायला हवं. तेच नाही असा काहीतरी प्रकार ब-याच बाबतीत सुरू नाही ना? अनेक ठिकाणी आपली इंटलेक्च्युअल क्षमताच कमी पडते आहे आणि काहीवेळा ती असली तरी ती दाखवण्यात आपण कमी पडतो असे वाटते. अर्थात, आडात काही नसतानाही आपला पोहरा पूर्णपणे भरलेला आहे (त्यामुळे आडही भरलेला आहे असं भासवता येतं) असं दाखवण्यात यशस्वी होणारे काही चलाखही असतात. इतर भाषिकांमध्येही असे लोक असल्याने निदान या प्रकारे जरी कोणा मराठी माणसानं नाव कमावलं तरी या स्मार्टनेसकरता त्याचं कौतुक करायला हरकत नाही.

इंग्रजी लिहीणं आणि त्याहूनही बोलणं, हा आपला एक मोठा वीक पॉईंट आहे आणि ब-याचदा आपल्याला मराठी भाषिक वर्तुळाबाहेर घेऊन जाण्यातला तो मोठा अडथळा ठरतो. एखाद्या बहुभाषिकांच्या इंग्रजी चर्चेत महत्वाचा काहीतरी मुद्दा मांडावा असं सारखं वाटत असतं, पण जमत नाही. आत्मविश्वास वाटत नाही तो केवळ इंग्रजीमुळं. चर्चा संपल्यावर लक्षात येतं की आपल्या मनातला मुद्दा चांगला, वेगळा होता, तो कोणाकडेच नव्हता, पण आता उपयोग नाही. इंग्रजीच्या अभावामुळे तो मनातच राहिला. आपल्या या भाषेच्या अज्ञानाला किंवा आत्मविश्वास नसण्याला काहीवेळा मग मराठीच्या अभिमानाचं टोक दिलं जातं. समाजशास्त्र अभ्यासकांच्या एका राष्ट्रीय परीषदेत पत्रकारीतेवर भाषण करायला मिळाल्यावर त्या संधीचा उत्तम वापर करायचा सोडून, (परीषद मुंबईत असल्यानं) तुम्ही आमच्या शहरात आला आहात तेव्हा मी मुद्दाम माझ्या भाषेत बोलतो म्हणून एका पत्रकाराने अमराठी श्रोत्यांसमोर मराठीत भाषण करून इंग्रजीचं (आणि हिंदीचही) अज्ञान वा आत्मविश्वासाचा अभाव मराठीच्या अभिमानाखाली झाकला होता.

आपापलं कोंडाळ करून राहणं हा आपला आणखीन एक दोष. आपली सर्व, हुशारी, बुद्धीमत्ता, स्मार्टनेस, कॉमेंटस् करण्याची चमक हे सर्व आपापसातच असतं. आपल्या कोंडाळ्याच्या बाहेर जाऊन हे करण्याचा प्रयत्न आपण फारसा करत नाही. आणि हे आपण बाहेर असलो वा आपल्या एरियात, तरी आपल्या वागण्यात फरक पडत नाही. एका पाकिस्तानी शिष्टमंडळासमवेत एका महत्वाच्या ठिकाणी जेवायला बोलावले असताना, तेथे असलेले दोन-तीन मराठी पत्रकार त्या पाकिस्तानी लोकांबरोबर गप्पा मारण्याऐवजी शेवटच्या रांगेत बसून आपापसात गप्पा मारत होते. परदेशात कम्युनिकेशन विषयावरील एक कॉन्फरन्सच्या नेटवर्क बँक्वेलाही असाच एक अनुभव आला. एकतर ब-याचदा अशा नेटवर्क डिनरला दांड्या मारून लोकं खरेदीला जातात. या डिनरला हजर असणा-या दोन-चार मराठी मंडळींनी इतर अमराठी भारतीयांबरोबर एक टेबल पकडून आपापसात गप्पा हाणायला सुरूवात केली आणि शेवटपर्यंत ते टेबल काही सोडलं नाही.

एकूणच आपण फार बाहेर जायला तयार नाही, नवीन काही ऐकायला, पहायला, करायला तयार नाही. त्यामुळे वेगळं जरी काही करीत असलो तरी त्या क्षेत्रात एखाद दुसरा अपवाद वगळता मराठी नावं टॉपला नाही. एका आशियाई माध्यम संघटनेच्या फेलोशिप निवड समितीवर असल्याने एका भारतीयाला दिली जाणारी ही फेलोशिप मराठी पत्रकाराला मिळावी असा माझा प्रयत्न होता. त्याकरता मी स्वतः विविध मराठी संपादकांना फोन करून त्यांच्या वर्तमानपत्रांत ही बातमी छापावी, कार्यालयात त्याची नोटीस लावावी व त्यांच्याकडील चांगल्या लोकांना अर्ज करायला सांगावा म्हणून प्रयत्न केले. किती जणांनी हे केलं माहीत नाही. (काही ठिकाणी बातमी आली व काही ठिकाणी नोटीस लागल्याचं नक्की कळलं). पण एकाही मराठी पत्रकारानं अर्जच न केल्यानं अखेर ही फेलोशिप बेंगलूरूच्या एका पत्रकाराला मिळाली. १००० पौंडाच्या (सुमारे रू ७५००० ते ८००००) या फेलोशिपमध्ये पत्रकाराने जवळच्या एखाद्या देशाचा छोटा दौरा करून दोन, तीन लेख लिहावेत अशी अपेक्षा होती. त्यावरची एका मोठ्या वर्तमानपत्रातल्या वरीष्ठ पत्रकाराची अर्ज न करण्याबाबतची ऐकायला मिळालेली प्रतिक्रिया टिपिकल मराठीपणाला साजेशी होती. त्याचं म्हणणं होतं की फेलोशिपचे पैसे प्रवासखर्चाला पुरले तरी त्याकरता जी आठ-दहा दिवस रजा घ्यावी लागेल त्याची तरतूद या फेलोशिपमध्ये नाही.
हे एक केवळ उदाहरण झालं. पण आपली याच प्रकारची वृत्ती तर आपल्याला मारक ठरत नाही ना? हा तसेच इतर काय दोष आहेत आपल्यात? मराठी माणूस आर्थिक सत्तेत कमी पडतो आणि म्हणून स्वतःचा प्रभाव पाडू शकत नाही का? हे कारण काही प्रमाणात खरं असलं तरी ते तेवढंच एक कारण नाही. यात एक मुद्दा आहे तो क्षमता नसल्याने व गमावल्याने या वरच्या वर्तुळात न पोचण्याचा आणि दुसरा आहे तो क्षमता असूनही इतर काही कारणांमुळे वा दोषांमुळे नाव सर्क्युलेशनमध्ये नसण्याचा, त्या व्यक्तींचा प्रभाव नसण्याचा. का एकाही नियतकालिकाला एखाद्या विषयावर स्टोरी करताना त्या विषयातील एखादा मराठी तज्ज्ञ कोट घेण्यासाठी माहीत नसतो किंवा आठवत नाही?

आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरताना मराठी भाषिकांचा अभाव आणि बंगाली, तामीळ, मल्याळी भाषिकांची हजेरी प्रकर्षाने जाणवते. काही अपवाद वगळता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिकांमध्ये आपण नाही, राष्ट्रीय प्रश्नांबाबत न्यूज मॅगझीन्समध्ये नाही, टीव्हीवर नाही, परीषदांमध्ये नाही, महत्वाच्या जागांवर नाही. मग आपण आहोत तरी कुठे? कुठे लोप पावला आहे तो मराठी इंटलेक्च्युअलीझम, कलासक्तपणा, वैचारीक क्षेत्रातील आपला दबदबा आणि नाव? का सगळीकडे होते आहे आपली पिछेहाट?
सरकारी पातळीवर या विषयाबाबत पूर्ण अनास्था आहे. त्याची काही जाणीव तरी महाराष्ट्राच्या नेतृत्वाला (खरंतर राजकीय क्षेत्रात महाराष्ट्राला काही नेतृत्व आहे का हाच खरा प्रश्न आहे) आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.

महाराष्ट्राच्या पुढच्या २५ वर्षांची विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करणा-या पक्षाने इतर विकासाबरोबर याही विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचीही एक ब्ल्यूप्रिंट तयार केली पाहिजे. शेवटी इतर सर्व विकासाप्रमाणेच परत एकदा आपला वैचारिक दबदबा इरतत्र निर्माण करणं हेही महत्वाचे आहे. तोही एक प्रकारचा विकासच आहे. त्याकरता नसलेल्या क्षमता कशा निर्माण करायच्या आणि असलेल्या क्षमतांचं कसं प्रोजेक्शन करायचं ते ठरवणं महत्वाचं आहे. हे केलं आणि त्याचे काही चांगले परीणाम पुढील काळात दिसू लागले तर राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment